गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील दोन सख्ख्या बहिणींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र अचानक हरपले. वडिलांच्या आकस्मिक निधनाने दोघींवर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, या दुःखातून सावरत त्यांनी वडिलांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा निर्णय घेतला. मोठ्या जिद्दीने दोन्ही बहिणींनी वडिलांनी पाहिलेले कबड्डी चॅम्पियन होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. जन्मदात्या पित्याच्या निधनाच्या दुःखाचा डोंगर सावरत, अवघ्या २१ साव्या दिवशी या बहिणींनी ठाणे येथे १ ते ५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या कबड्डी स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले.
दौंड तालुक्यातील पारगाव या गावच्या वैष्णवी अनिल रावडे आणि साक्षी अनिल रावडे या दोन सख्ख्या बहिणींच्या लढावू वृत्तीची ही कहाणी आहे. त्यांचा परंपरागत शेती व्यवसाय. वडिलांच्या पश्चात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून घराची जबाबदारी सांभाळली. २४ म्हशींचा आणि ४ गायींचा गोठा सांभाळत त्या आपल्या आईला आणि आजीला घर कामामध्ये मदत करत आहेत. घरची कामे सांभाळून या दोघी बहिणी रावडे कुटुंबाचा आधारस्तंभ बनल्या आहेत. म्हशींच्या धारा काढणे, दूध डेअरीवर घालणे, गोठा स्वच्छ करणे, म्हशींसाठी स्वत: टेम्पो चालवत चारा आणणे, म्हशींना अंघोळ घालण्यापासून सर्व कामे दोघी करतात.
रावडे कुटुंब मुळचे पुरंदर तालुक्यातील गराडे गावचे. गेली चार पिढ्या ते दौंड तालुक्यातील पारगाव येथे राहतात. त्यांचा मूळ व्यवसाय शेती आणि जोड व्यवसाय म्हणजे म्हौस पालन हा आहे. अनिल रावडे यांना दोन मुली आहेत. आपल्या मुलींनी शिक्षण घ्यावे तसेच कबड्डीमध्ये नाव कमवावे अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मुलींना शिक्षणासाठी पुण्यात पाठवले. कबड्डीचे खास प्रशिक्षण सुरू केले. घरात सर्व व्यवस्थित सुरू असताना मुलींच्या आजोबांचे निधन झाले. त्यानंतर सावडण्याचा विधीवेळी वडील अनिल रावडे यांचा विस्तवावर पाय पडला. त्यात त्यांना मोठी जखम झाली. वडिलांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्यांची जखम बरी न होता चिघळत गेली.
घरातील कर्ती व्यक्ती आजारी पडल्याने घरातील सर्व जबाबदारी अनिल यांची मोठी मुलगी वैष्णवी हिच्या खांद्यावर येऊन पडली. ती महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून आपल्या घरी परत आली. जवळ असलेल्या खुटबाव येथील कै. पोपटराव थोरात महाविद्यालयात प्रवेश घेत तिने वडिलांचा म्हशींचा गोठा सांभाळण्याचे काम सुरु केले. हे करत असताना प्रशिक्षक महादेव टकले यांचे तिला मार्गदर्शन लाभले. तिने खुटबाव येथे कबड्डीचा सराव सुरु ठेवला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत या दोन बहिणींने मिळवलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.