दौंड (पुणे): तालुक्यातील एमआरएन भीमा पाटस साखर कारखान्याने सन २०२४-२५ या गळीत हंगामामध्ये उसाला प्रतिटन २८०० रुपये बाजारभाव जाहीर केला असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील यांनी दिली.
कारखाना सुरू होऊन ६० दिवस झाले तरी बाजारभाव जाहीर केल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये दराविषयी उत्सुकता होती. मागील वर्षी पाऊस चांगल्या झाल्याने तालुक्यात उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यात यवत येथील अनुराज साखर कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप लवकर होत नाही. दौंड शुगर कारखान्याने उसाचा दर २८०० रूपये जाहीर केले. त्यानंतर भीमा पाटसनेसुद्धा नुकताच २८०० रूपये दर जाहीर केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अनेक कारखान्यांनी उसाची पहिली उचल कमी दराने जाहीर केली आहे.
भीमा कारखान्याने ६० दिवसात ४ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप करत ३ लाख ९४ हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. साखर उतारा १०.८८ इतका आहे. एमआरएन ग्रुपने भीमा कारखान्याचे नव्याने विस्तारीकरण केल्याने यंदा कारखाना दररोज सुमारे आठ हजार टन उसाचे गाळप करत आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक रविकांत पाटील म्हणाले, ‘‘भीमा सहकारी साखर कारखान्याने नेहमीच शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील इतर साखर कारखान्यांच्या बरोबरीनेच भीमा पाटसनेही बाजारभाव दिला आहे. शेतकऱ्यांनी कारखान्यात जास्तीत जास्त ऊस देऊन गाळपाचे दहा लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्या करिता सहकार्य करावे.’’
सभासदांच्या मालकीची ही संस्था टिकावी, यासाठी सर्वच सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जास्तीचे गाळप झाले तर साखर व ईतर पर्यायी उत्पादन,मध्ये वाढ होईल. पर्यायाने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन कारखाना आर्थिक अडचणीमधून बाहेर पडण्यास मदत होईल. त्यासाठी सभासदांनी चालू गळीत हंगामात त्यांचा ऊस इतर कारखान्यांना गळितास न देता आपलेच कारखान्यास गळितास देऊन सहकार्य करावे.
विकास शेलार – संचालक भिमा पाटस