पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी पुण्यात होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार प्रमुख मार्गदर्शक असण्याची शक्यता आहे. या महायुतीच्या मेळाव्याला प्रत्येक जिल्ह्यात तेथील पालकमंत्री मार्गदर्शन करतील, असे महायुतीच्या नियोजनानुसार ठरलेले आहे. त्यानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांचे मार्गदर्शन ऐकून त्यानुसार कामे करावी लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाटाघाटींमध्ये भाजपला पुण्याचे पालकमंत्रीपद अजित पवार यांना द्यावे लागले. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये अद्याप अस्वस्थता आहे. असे असताना आता भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार यांचे मार्गदर्शन ऐकून घ्यावे लागणार आहे.
महायुतीच्या जिल्हानिहाय सभा महाराष्ट्रभर १४ जानेवारी रोजी आयोजित करण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचा पहिला मेळावा रविवारी (ता. १४) पुणे शहरात म्हात्रे पुलाजवळ शुभारंभ मंगल कार्यालय येथे दुपारी चार वाजता होणार आहे. याच्या नियोजनाची बैठक आज झाली. या मेळाव्यात पालकमंत्री अजित पवार हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज पार पडली. या वेळी तिन्ही पक्षांचे शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ते कामाला लागले आहेत. बूथसह नमो ॲपद्वारे काम सुरू झाले आहे. पण या तिन्ही पक्षात समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. यासाठी राज्यभर १४ जानेवारी रोजी मेळावे होणार आहेत. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार या तिघांपैकी एकजण उपस्थित राहणार आहेत, असे शहराध्यक्ष धीरज घाटे, दीपक मानकर यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भाजपने अजित पवार यांना दिले आहे. त्यामुळे महायुतीचा पहिला मेळावा होत असताना शिंदे व फडणवीस हे न आल्यास अजित पवार गट, शिवसेनेसह भाजप कार्यकर्त्यांना दादांचे मार्गदर्शन ऐकून त्यानुसार पुढील काम करावे लागणार आहे.