पुणे : एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात नव्या साध्या डिझेल बसचा टप्प्याटप्प्याने समावेश करत आहेत. ई-बसेस ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाली असून एसटीच्या साध्या २५०० डिझेल बस देखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यापैकी तामिळनास्थित कारखान्यात बनवलेली एसटीची पहिली स्वमालकीची बस रविवार, २० ऑक्टोबर रोजी एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, पुणे येथे दाखल झाली आहे. सर्व तपासणीअंती या बसची पासिंग झाल्यानंतर पुढील गाड्या टप्प्याटप्याने एसटीत दाखल होणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.
मधल्या काळात एसटी महामंडळ कमालीचे आर्थिक डबघाईला जाण्यास सुरुवात झाली होती. कोरोना काळ, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप, जुन्या जीर्ण बसेसची दुरवस्था, संपानंतर प्रवाशांनी फिरवलेली पाठ, यामुळे एसटी महामंडळ अडचणीत आले होते. मात्र त्यानंतर शासनाने महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेली एसटी प्रवासातील सवलत, यामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत क्रांतिकारक बदल घडला. या दोन्ही योजनांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. यानंतर एसटी महामंडळाकडून ई-बसेस दाखल करण्यास सुरुवात झाली. या बसेस वर्षभरात मोठ्या संख्येने एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तर दुसन्या बाजूला एसटीच्या साध्या २५०० डिझेल बसदेखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्यापर्यंत ५०-१०० बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) येथील कारखान्यात साध्या डिझेल बसेसची मूळ प्रतिकृती तयार झाल्यानंतर पहिली बस रविवार, २० ऑक्टोबर रोजी एसटीच्या दापोडी, पुणे येथील कार्यशाळेत दाखल झाली आहे. विविध तपासण्या करून यापुढील गाड्या नोव्हेंबरपासून एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.