पुणे : पुण्यातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकावर जंगली महाराज रस्त्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. ही धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१६) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर सिक्युरिटी गार्डच्या ठेक्याच्या वादातून एका माजी सैनिकाने दुसऱ्या माजी सैनिकावर गोळीबार केला. ही घटना शेवाळवाडी (ता. हवेली) नाक्याजवळील संपन्न होम गेटच्या समोर बुधवारी (ता.१७) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या दोन्ही घटना ताज्या असतानाच, आता भुमकर चौक परिसरात गुरुवारी (ता.१८) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला आहे.
पहिला गोळीबार हा धीरज दिनेशचंद्र आरगडे या बांधकाम व्यावसायिकावर झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जयवंत खलाटे (रा. गोंधळेनगर, हडपसर) असं दुसऱ्या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सुधीर रामचंद्र शेडगे व त्यांचा मुलगा ऋषिकेश शेंडगे (दोघेही रा.शेवाळवाडी, ता. हवेली) असे हडपसर पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर तिसरा गोळीबार हा गणेश गायकवड (रा. वारजे) यांच्यावर झाल्याची माहिती मिळत आहे. हा गोळीबार माचीस मागितल्याचा कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
पुण्यात वाढतंय गुन्हेगारीचे प्रमाण
शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. या तिन्ही घटना सलग तीन दिवस घडल्याने पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. या तिन्ही घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.