पुणे: पुणे शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सध्या गोळीबाराची घटना झाली नाही, आठवडा जात नाही. या घटनांवर अद्यापही पोलिसांना नियंत्रण मिळवता आले नसल्याचे चित्र आहे. आता सिंहगड रस्ता परिसरात पूर्व वैमनस्यातून अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सिंहगड रस्ता परिसरातील अभिरुची मॉलच्या जवळ घडली.
एका मुलाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या अभिरुची मॉल परिसरात शनिवारी २२ जून रोजी सायंकाळी एक अल्पवयीन मुलगा आणि त्याचे मित्र गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तिथे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी थेट मुलांवर गोळीबार केला. पिस्तुलातून गोळी झाडल्यानंतर मुलगा वाकल्याने तो बचावला, अशी माहिती मुलाने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, तसेच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाची चौकशी केली. तसेच घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर तिथे पुंगळी सापडली नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या वादातून अल्पवयीन मुलावर गोळीबार केल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव पुढील तपास करत आहेत.