पुणे : पुण्यात एका तरुणाने दारू पिऊन हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) वाघोली परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान, या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशाल कोलते (रा. बकोरी गाव, ता. हवेली, जि. पुणे) असं या आरोपी तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी विशाल आणि त्याचा मित्र संदीप हरगुडे याला रुग्णवाहिकेतून व्यसनमुक्ती केंद्रात नेण्यात येत होते. यावळी विशालने संदीपला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊ नये, अशी मागणी केली. विशालच्या विरोधानंतरही व्यसनमुक्ती केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी संदीपला जबरदस्तीने रुग्णवाहिकेत बसवले. त्यावेळी संतापलेल्या विशालने त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी फायर केली. तसेच दगडाने रुग्णावाहिकेच्या काचाही फोडल्या.
त्यानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी विशाल कोलते याला ताब्यात घेतले. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.