पुणे : पुण्यातील वारजे परिसरात तिघांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. बारामती लोकसभा मतदार संघासाठीचे मतदान संपल्यानंतर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. ही घटना वारजे येथील रामनगर परिसरात असलेल्या शक्ती चौकात रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
नेमकं काय घडल ?
बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या वारजे परिसरात मंगळवारी मतदान पार पडले. दिवसभरातील मतदान प्रक्रिया संपल्यानंतर रामनगरमध्ये रात्री दुचाकीवरुन तिघेजण आले. या तिघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबारच्या आवाजाने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वारजे आणि गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.
संशयित आरोपींनी हवेत गोळीबार का केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. गोळीबार केल्यानंतर आरोपी मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गाने कात्रजच्या दिशेन पसार झाले. पोलिसांकडून आसपासचे सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पाेलिसांनी दिली.