अमिन मुलाणी
सविंदणे : शिरूरमध्ये रविवारी (ता. १४) मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह शिरूर पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत, दहशत निर्माण करण्यासाठी विनापरवाना पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील टोळक्याची धरपकड सुरू केली आहे.
आशितोष काळे (वय २४, रा. साईनगर शिरूर), अरबाज शेख (वय २३, रा. सय्यद बाबा नगर, शिरूर) व प्रकाश गायकवाड (वय २०, रा. जाधव मळा, रामलिंग रोड, शिरूर) यांना गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आली आहे. तर पप्पू राजापूरे, प्रवीण तुबाकी, अरबाज खान, शुभम गाढवे व कुणाल मस्के यांच्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी व विनापरवाना शस्त्राच्या आधारे गोळीबार करून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
आदित्य भोईनल्लू (वय २१, रा. कामाठीपुरा, शिरूर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचा भाऊ वैभव याच्यासोबत असलेल्या जुन्या वादाच्या रागातून अरबाज शेख याने पुणे-नगर रस्त्यावरील आर. के. हॉटेलजवळ आदित्यला अडवून त्याच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, त्याला गोळी लागली नाही. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर आदित्य कामाठीपुरातील मुलांसह हनुमान मंदिराजवळील कट्ट्याजवळ थांबलेला असताना तेथे अरबाज शेख, आशितोष काळे, पप्पू राजापुरे, अरबाज खान, प्रवीण तुबाकी, प्रकाश गायकवाड, शुभम गाढवे व कुणाल म्हस्के हे दुचाकीवरून आले. त्यांना पाहून भोईनल्लू व त्याचे मित्र पळून जात असताना आशितोष काळे याने त्याच्याकडील पिस्तुलातून गोळीबार केला.
या प्रकारानंतर आदित्य भोईनल्लू याने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी सोमवारी (ता. १५) त्यातील तिघांना अटक केली आहे.