पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या आठवड्यावर आल्याने हौशी गडप्रेमींकडून सिंहगडाची स्वच्छता मोहिम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान, घाट रस्त्यावर शेकोटी आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. सायंकाळी सहानंतर गड पर्यटकांसाठी बंद होतो. असे असतानाही सिंहगडासारख्या वर्दळीच्या गडाच्या रस्त्यावर दारू पार्ट्या सुरू असतात, ही बाब प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही, असा प्रश्न दुर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे.
‘ट्रॅश टॉक’ या ग्रुपने दोन दिवसांपूर्वी शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून सिंहगडावर स्वच्छता मोहीम राबविली. तानाजी कड्यापासून ते घाट मार्गावर फिरून त्यांनी प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांच्या पिशव्यांसह इतर कचरा गोळा केला. या मोहिमेविषयी बोलताना ‘ट्रॅश टॉक ग्रुप’चे प्रमुख केदार पाटणकर म्हणाले की, स्वच्छता मोहिमेदरम्यान आम्हाला मुख्य रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी शेकोट्या आणि शेजारी दारूच्या बाटल्या आढळल्या. एरवी सायंकाळी सहानंतर गड पर्यटकांसाठी बंद होतो. कोंढणपूरचे मुख्य गेट बंद केल्यानंतर रात्री पर्यटकांना गडावर जाता येत नाही, असे प्रशासनाकडून सांगितले जाते. मग घाट रस्त्यावर रात्री शेकोट्या पेटवल्या जातात, दारू पार्ट्या कशा होतात, हे कोडे आम्हाला उलगडले नाही.
प्लास्टिक कचऱ्याबरोबरच घाटात डोंगर उतारांवर फेकलेले लहान मुलांचे डायपरही स्वच्छता मोहिमेदरम्यान आम्ही गोळा केले. गडाचे पावित्र्य राखण्याचे भान अनेक पर्यटक बाळगत नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने या गैरप्रकारांना तातडीने आळा घातला पाहिजे, अशी मागणी केदार पाटणकर यांनी केली.