वाडा : खेड तालूक्यातील चासकमान धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि. २१) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. प्रताप सयाजी फणसे (वय- ४१, रा. नागपूर चाळ, येरवडा, पुणे) असे धरणात बुडालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रताप फणसे हे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये कार्यरत होते. धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी उतरलेल्या फणसे यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते बुडाले.
दरम्यान, पुणे येथील ७ ते ८ जण रविवारी वर्षाविहारासाठी चासकमान धरणावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना धरणाच्या पाण्यात पोहण्याचा मोह न आवरल्याने ते पाण्यात उतरले. मात्र, यापैकी प्रताप फणसे यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच विर्व ग्रामपंचायतीचे उपसरपंच दीपक कालेकर, विजय दोरे, अजय खंडे, सुरज दोरे, चंद्रकांत दोरे आदींनी तेथील स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने प्रताप यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. खेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अमोल चासकर, पोलिस अंमलदार आर. आर. दाते, शंकर गोपाळे पुढील तपास करीत आहेत.
बंदी असूनही चास-कमान धरणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी
चास-कमान धरण परिसरात पावसाचा जोर कमी असला तरी भीमाशंकर खोऱ्यात पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. सुट्टीचा वार असल्यामुळे त्यात रिमझिम पाऊस असल्याने चास-कमान धरण परिसरात पर्यटकांची गर्दी आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर जाण्यास जिल्हाधिकारी यांनी बंदी घातली असून, चास-कमान धरण परिसरात पर्यटक गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.