पुणे : पुणे स्टेशनसमोरील एका दुकानाला आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.04) पहाटे घडली आहे. या घटनेने दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहेत. दुकानालगतच्या वरील भागात लॉज असून तेथील प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.
पुणे स्टेशनच्या समोरील बाजूस विल्सन गार्डन हे लॉज आहे. लॉजच्या इमारतीत अगरवाल जनरल स्टोअर्स आहे. शुक्रवारी पहाटे साडेचारच्या सुमारास दुकानातून मोठ्या प्रमाणाव धूर येत होता. स्थानिक नागरिकांना या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत दुकानातील सर्व साहित्य जळाले. आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट उडाली. त्यावेळी जवानांनी लॉजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका केली.
दरम्यान, या घटनेत सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. प्राथमिक चौकशीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.