पुणे : नदीपात्रात बुडालेल्या दोघांची अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका झाली. भिडे पूल आणि कर्वेनगर परिसरात शुक्रवारी (दि. ३०) हे प्रकार घडले. भिडे पूल परिसरात एक जण नदीपात्रातून वाहून गेल्याची माहिती अग्निशमन दलाला शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या कसबा पेठेतील अग्निशमन केंद्राचे प्रमुख कमलेश चौधरी आणि जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
या पथकाने त्वरित शोधमोहीम राबविण्यास सुरुवात केली. अग्निशामक जवानांनी महापालिका भवन परिसरातील सिद्धेश्वर घाट परिसरात शोधमोहीम राबविली. तेथे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून आलेल्या एकाला जवानांनी बाहेर काढले. जवानांच्या तत्परतेमुळे तो बचावला. अजयकुमार गौतम (वय ४५) हे बचावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दुसऱ्या एका घटनेत सकाळी सातच्या सुमारास कर्वेनगर भागात नदीपात्रात एक जण अडकल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच वारजे आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील अधिकारी प्रभाकर उमराटकर आणि जवान अग्निशामक दलाच्या बोटीसह घटनास्थळी दाखल झाले. तिथे एक व्यक्ती नदीपात्रात मधोमध अडकल्याचे निदर्शनास आले. जवानांनी रस्सी, लाइफ रिंग, लाइफ जॅकेट यांचा वापर करीत पाण्यात उतरून अडकलेल्या इसमास धीर देत त्याला सुखरूप पाण्याबाहेर काढले.