पुणे : सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा परिसरातील ओम पॅलेस या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सृष्टी डिझायनर या कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात आग लागली. या आगीत कार्यालयातील संगणक, विद्युत उपकरणे, तसेच अन्य साहित्य जळाले. कार्यालय बंद असल्याने गंभीर दुर्घटना टळली. ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता अग्निशमन दलाने व्यक्त केली. दरम्यान, आग लागल्याची माहिती मिळताचअग्निशमन दलाच्या जवानांना तत्काळ पाचारण करण्यात आले. जवानांनी अवघ्या १५ ते २० मिनिटांत आग आटोक्यात आणली.
ओम पॅलेस इमारतीतील सृष्टी डिझायनर या कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या सिंहगड रस्ता केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. कार्यालय बंद असल्याने जवानांनी रहिवाशांकडून चावी घेतली. कार्यालयात कोणी अडकले नसल्याची खात्री जवानांनी केली. त्यानंतर जवान नरेश पांगारे, निलेश पोकळे, अजित शिंदे, विक्रम मच्छिंद्र, दिग्विजय नलावडे यांनी पाण्याचा मारा करून पंधरा ते वीस मिनिटांत जवानांनी आग आटोक्यात आणली.
या आगीत संगणक, प्रिंटर, लाकडी सामान, विद्युत उपकरणे, तसेच अन्य साहित्य जळाले असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.