-योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरुर तालुक्यातील पारोडी येथे भीमा नदीच्या कडेला ऊस क्षेत्रामधील बाळासाहेब टेमगिरे , अक्षय टेमगिरे, रोहिदास टेमगिरे यांच्या उसाच्या शेतात आग लागल्याची घटना घडली आहे. त्यात दोन एकर ऊसाचे नुकसान झाले आहे.
बाळासाहेब टेमगिरे यांच्या शेतातील ऊसाला आज सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचे योगेश टेमगिरे यांना दिसले. त्यानंतर घटनास्थळी दौलत टेमगिरे, रवी टेमगिरे, आदिनाथ ढमढेरे, योगेश शेंडगे, सुयेश टेमगिरे, करण टेमगिरे, मंगेश टेमगिरे, नितीन टेमगिरे आदींनी धाव घेत कीटकनाशक फवारणी करणाऱ्या इलेक्ट्रिक पंपाने आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आले. त्यावेळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्यात आली. आग विझविण्यासाठी शेतकऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहे. तसेच 10 ते 15 एकर ऊस जळण्यापासून वाचवण्यात त्यांना यश आले आहे.
शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली अशी प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. पारोडी मध्ये भीमा नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. परिसरातील कारखान्याच्या गाळप क्षमतेच्या डोईजड ऊस झाला आहे. त्यात शॉट सर्कीट होवून ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळावी, याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.