उरुळी कांचन: नववीत शिक्षण घेत असलेल्या शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.14) संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश दिलीप बडेकर (वय 19, रा.तुपे वस्ती श्री रेसीडंसी फ्लॅट नंबर 302 उरूळीकांचन ता. हवेली जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 15 वर्षीय पिडीत मुलीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी ही उरुळी कांचन येथील एका शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पिडीत मुलगी महात्मा गांधी विद्यालयाच्या रस्त्यावरून जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केला. तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे. दरम्यान, आरोपीने पिडीत मुलीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. तसेच आरोपीने तिचा घरापर्यंत पाठलाग करून विनयभंग केला, अशी फिर्याद पिडीत मुलीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यानुसार आरोपी दिनेश बडेकर यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहे.