पुणे : अल्पवयीन मुलीची ओळख करत तिचा लपून अश्लील व्हिडीओ तयार करून तिला ‘ब्लॅकमेल’ करीत वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अखेर या त्रासाला कंटाळून पिडीत मुलीने विषारी द्रव्य प्राशन करत आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न देखील प्रयत्न केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तरूणाविरुद्ध आयपीसी कलम ३७६, ३७६ (२), (एन), ३७६ (२) (जे), ५०६, ४२७, पोक्सो ४ व ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी २०२४ पासून सुरु होता. कपिल रवींद्र वाल्हेकर (वय १८, रा. कोथरूड) असे गुन्हे दाखल झालेल्याचे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एका १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पिडीत मुलीची ओळख सिंहगड कॅम्पसमधील वैणुताई कॉलेज याठिकाणी झाली होती. त्यानंतर आरोपी संबंधित मुलीशी मैत्री वाढवत गेला. जानेवारी २०२४ मध्ये ही मुलगी घरी एकटीच असताना आरोपी कपिल तिच्या घरी गेला. त्याला ही मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानादेखील तिच्याशी त्याने शरिरिक संबंध ठेवले. त्यानंतर कपिलने मुलीकडे न्यूड व्हिडीओ बनवण्याची मागणी केली. मात्र, मुलीने त्याला नकार दिल्याने त्याला राग आला. चिडलेल्या आरोपी कपिलने पिडीत मुलीच्या घरातील बाथरुमच्या खिडकिची काच फोडली. ती आंघोळ करतानाचा अश्लील व्हिडीओ तयार केला. त्यानंतर हा व्हिडीओ त्याने आपल्या मोबाईलवर या मुलीला दाखवत तो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करीत वारंवार जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले.
दरम्यान कपिलने आठ एप्रिल रोजी या मुलीला फोन करून भेटायला बोलावले. त्याने तिला तिथे त्रास देण्यास सुरुवात केली. त्यावेळी मानसिक त्रास झाल्याने तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तिने घरात असलेले फिनाईल प्राशन केले. त्यानंतर तिला त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी खासगी रुग्णालयात भरती केले. उपचार घेतल्यानंतर तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. १२ एप्रिल २०२४ रोजी आरोपी कपिलने पुन्हा तिला फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली.यावेळी संबंधित मुलीने त्याला घरी बोलावून घेत आईवडिलांसमोर घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर आरोपी कपिल वाल्हेकर याने देखील पिडीत मुलीच्या कुटुंबियांच्याविरुद्ध आपल्याला हातपाय बांधून मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. संबंधित मुलीसोबत आपले प्रेमसंबंध होते. तिने फिनाईल प्राशन केल्याने तिला भेटायला घरी गेलो होतो. त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याची तक्रार त्याने दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आयपीसी कलम ३२३, ३२४, ३४२, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.