पुणे : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी बोलावून घेत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला. त्यानंतर मुलीला ब्लॅकमेल करत तिच्याकडे मोबाईल, दुचाकीची मागणी केली, तसेच आठ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 25 मे ते 3 जून 2024 या दरम्यान कुडजे गावच्या हद्दीत घडला आहे.
याप्रकरणी शिरुर तालुक्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने बुधवार 26 जून रोजी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विकास गजानन जाधव (रा. आगळंबे गाव, वर्तकगेट, ता. हवेली) याच्यावर भादंवि कलम 376/2/एन, 506, 507 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आणि आरोपी विकास जाधव याची ओळख मे 2024 मध्ये सोशल मीडिया प्लॅफॉर्म इन्स्टाग्रामवर झाली. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. आरोपी जाधव याने मुलीला भेटण्यासाठी उत्तमनगर परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर तिला दुचाकीवरून कुडजेगाव परिसरातील एका लॉजमध्ये नेऊन तिच्या सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक संबंध ठेवतानाचा अश्लील व्हिडीओ त्याने आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला.
त्यानंतर आरोपीने अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार भेटण्यास बोलावून घेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. आरोपी विकास जाधवने त्याच्याकडे असलेले अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. तसेच सोन्याची चैन, मोटर सायकल आणि मोबाईल फोनची देखील मागणी केली. त्याचबरोबर तिच्याकडून जबरदस्तीने आठ हजार रुपये घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.