लोणी काळभोर : शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तारासिटी जवळ मंगळवारी (ता.९) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कुटुंबासोबत लोणी काळभोर परिसरात राहतात. फिर्यादी यांना मुलगा व मुलगी अशी दोन मुले आहेत. मंगळवारी (ता.९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या घरातील काम करत होत्या. त्यावेळी मुलीने फिर्यादी यांना सांगितले की, गिझर सुरु केला आहे, पाणी गरम झाल्यावर तू अंघोळ करून घे.
त्यानुसार फिर्यादी या घरातील काम आटोपल्यानंतर अंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेल्या. फिर्यादी अंघोळ करुन बाहेर आल्यानंतर त्यांना घरामध्ये मुलगी आढळून आली नाही. तेव्हा फिर्यादी यांना मुलगी जीन्स पॅन्ट व टी शर्ट घालून बाहेर गेली असल्याचे समजले. त्यानंतर फिर्यादी यांनी मुलीची नातेवाईक व परिसरात शोधाशोध केली. मात्र, त्यांना मुलगी आढळून आली नाही.
दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलगी असल्याचा फायदा घेऊन तिला फूस लावून पळवून नेले, अशी फिर्याद मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.