पुणे: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी दोन महिलांसह तिघांची ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विश्रांतवाडी भागातील एका ३८ वर्षीय महिलेची चोरट्यांनी ४२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केली. या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. तक्रारदार महिलेच्या मोबाईल क्रमांकावर जानेवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर जादा परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांनी या महिलेला जाळ्यात ओढले. महिलेला शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक योजनांची माहिती देऊन तिला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ऑनलाईन पद्धतीने ४२ लाख २९ हजार रुपये जमा केले. सुरुवातीला महिलेला परताव्यापोटी पैसे देण्यात आले. त्यानंतर महिलेला पैसे दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.
खराडी भागातील एका व्यावसायिकाचीही शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. त्यासंदर्भात खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर, घरातून ऑनलाईन पद्धतीने कामाची संधीचे (ऑनलाईन टास्क) आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार
महिला नऱ्हे परिसरात वास्तव्याला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून समाज माध्यमातील मजकूर, तसेच चित्रफितींना दर्शक पसंती मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले होते. या महिलेने चोरट्यांच्या खात्यात रक्कम जमा केली. सुरुवातीला तिला परतावा दिल्यानंतर चोरट्यांनी दूरध्वनी बंद करून टाकले.