शिक्रापूर (पुणे) : येथे विटांचा ट्रक खाली करण्यासाठी आलेल्या एका इसमाचे दोघांनी अपहरण केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे शरद गरजे व बापू गरजे या दोघांवर अपहरणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील एका हॉटेलमध्ये विटांची वाहतूक करणारे ट्रकचालक संजय गायकवाड यांसह कामगार राधाकिसन शिंदे, लखन गायकवाड, सोमनाथ निकम, अमोल निकम असे जेवणासाठी थांबलेले असता, शरद गरजे व बापू गरजे तेथे आले आणि राधाकिसन याच्यासोबत पैशावरून वाद घालू लागले.
दरम्यान, चालक संजय गायकवाड यांनी त्यांच्याशी चर्चा केली. राधाकिसनकडे आमचे दहा हजार रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे संजय यांनी याबाबतची माहिती त्यांच्या वीटभट्टी मालकांना दिली असता त्यांनी शरद गरजे याच्या मोबाईलवर दहा हजार रुपये पाठवले. मात्र, शरद याने आम्ही दहा मिनिटांत राधाकिसनला आणून सोडतो, असे म्हणून त्यांच्या जवळील वाहनातून नेले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत त्याला पुन्हा आणले नाही.
याबाबत चालक संजय हनुमंत गायकवाड (वय ३४, रा. राक्षेवाडी, रांजणगाव सांडस) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी शरद गरजे व बापू गरजे (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.