दौंड: जनावरांची कत्तल करण्यासाठी चाललेला एक टेम्पो गोरक्षकांनी मलठण (ता.दौंड) येथे रविवारी (ता.२१) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पकडला आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करून तीन लाखाचा मुदेमाल जप्त केला आहे. तर अमोल खंडाळे, सागर खंडाळे (दोघे रा. जळगाव कप, ता. बारामती जि. पुणे ) व जनावरांचे मुळ मालक आजर शेख (रा. राजेगाव ता. दौड जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आमीर जिलानी शेख (वय-३४, नेमणूक- दौंड पोलीस ठाणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमीर शेख हे गेल्या 3 वर्षांपासून दौंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शेख यांना रात्री रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नितीन सुनिल लवगारे यांचा फोन आला की, मलठण येथे जनावरांची कत्तल करण्यासाठी चालवलेला एक टेम्पो पकडला आहे. आम्हाला लवकर मदत हवी आहे, असे सांगण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच, पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा मलठण येथील पाण्याच्या टाकीजवळ माहिती देणारे नितीन लवगारे उभे होते. नितीन लवगारे हे पकडलेल्या टेम्पोजवळ पोलिसांना घेऊन गेले. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता, टेम्पोमध्ये लहान-मोठे जर्शी जातीचे वासरे दाटीवाटीने कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली.
टेम्पोमध्ये 27 जर्शी वासरे, एक गिरगाई जातीचे वासरू, एक जर्शी गाय अशी २९ जनावरे आढळून आली. पोलिसांनी ३ लाखाचा महिंद्रा कंपनीची पिकअप टेम्पो जप्त केला आहे. तर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.
दरम्यान, २९ जनावरांची सुखरूप सुटका केल्यानंतर जनावरांची पशुवैद्यकिय अधिकारी यांच्याकडे तपासणी करण्यात आली. त्यानंतर जनावरांची केडगाव चौफुला येथील बोरमलनाथ गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.