पुणे: लोणी काळभोरसह पुणे शहरात बोगस (तोतया) पत्रकारांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सामान्य नागरिकांसह व्यायसायिकांना धमक्या देऊन पैसे उकळल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच पत्रकार असल्याचे सांगून खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. फोन करून आपण स्वतः पत्रकार असल्याचे सांगत वर्तमानपत्रात खोटया बातम्या छापण्याची तसेच पोलिसांमध्ये खोटी तक्रार देऊन गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत महिन्याला हप्त्याची मागणी केल्याप्रकरणी तीन जणांवर लष्कर पोलिस ठाण्यात खंडणीचा (भादंवि 384, 385, 34) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषण साळवे (45), संदीप रासकर (43) आणि अक्षय वाघमारे (30) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी राजेश जनार्दन श्रीगीरी (53, रा. वेस्ट स्ट्रीट कॅम्प, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. हा गुन्हा 15 ते 20 जुलै 2023 आणि 21 ते 22 ऑगस्ट 2023 रोजी रात्री पावणे बारा वाजता कॅम्प परिसरातील वेस्ट स्ट्रीट येथे घडला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भुषण साळवे याने फिर्यादी राजेश श्रीगीरी यांना फोन करून स्वतः पत्रकार असल्याचे सांगितले. तुम्ही बालाजी सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्यांचा क्लब चालविता आणि त्यातून पैसे कमवत आहात. तसेच तुम्ही अवैध धंदे देखील करत आहेत. मला हप्ते सुरु करा, नाहीतर मी तुमच्या क्लबबद्दल वर्तमानपत्रात बातम्या छापेल. तसेच पोलिसांकडे खोटी तक्रार देऊन गुन्ह्यात अडकविण्याची धमकी भुषण सावळे याने श्रीगीरी यांना दिली. माझा सहकारी संदीप रासकरच्या मोबाईल नंबरवर दर महिन्याला 3 हजार रूपये द्यावे लागतील, असे धमकावतदोन महिन्यांचे 6 हजार रूपये त्याने घेतले. त्यानंतर अक्षय वाघमारेने श्रीगीरी यांना प्रत्यक्ष भेटून स्वतः पत्रकार असल्याचे सांगुन श्रीगीरी यांच्याकडे दर महिन्याला हप्ता स्वरूपात पैशाची मागणी केली. त्यामुळे सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगीरी हे राजकारणात सक्रिय आहेत. ते हैदराबाद या मुळ गावी गेल्याने त्यांनी पुण्यात परत आल्यानंतर तात्काळ पोलिसांकडे तक्रार दिली. लष्कर पोलिसांनी भुषण साळवे, संदीप रासकर आणि अक्षय वाघमारे यांच्याविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.
हडपसर, लोणी काळभोर परिसरात मोठा सुळसुळाट
हडपसर, लोणी काळभोर परिसरात बोगस पत्रकारांचा मोठा सुळसुळाट पाहायला मिळत आहेत. अवैध बांधकाम व इतर दोन नंबर व्यावसायिक यांना धमकी देत पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. लोणी काळभोर व परिसरात एका तथाकथित मोठ्या पत्रकार संघटनेच्या मोहरक्याने परिसरातील अवैध धंदे बंद करण्याबाबतचे निवेदन दिले. त्यानंतर या प्रकरणात तडजोड करत पैसे उकळल्याची जोरदार चर्चा आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित पत्रकार संघटनेच्या वरिष्ठांना मिळूनही संबंधितांवर अद्याप कारवाई केलेली नाही. या प्रकारानंतर पोलिसांनी अशा लोकांना वेसण घालत कारवाई करण्याची मागणी होत आहे .