लोणी काळभोर : कामाचे पैसे मागितल्याने राग धरून कामगारासह त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींना लाकडी दंडूक्यासह दगडाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परिसरात रविवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत अर्जुन काकासाहेब शिंदे (वय २७ धंदा -मजुरी रा. खोतवाडी ता. इचलकरंची जि, कोल्हापुर), त्याचा भाऊ करण शिंदे, बहिण वंदना शिंदे व मेव्हणा करण चांदणे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अर्जुन शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिप संजय गायकवाड, रमेश प्रकाश मेकलवार व सुरजितसिंग निर्मलसिंग सथान (सर्व रा. पठारेवस्ती, कदमवाकवस्ती ता. हवेली जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्जुन शिंदे हे संजय गायकवाड यांच्याकडे गवंडी म्हणून काम करीत होते. शिंदे हे कामाचे राहिलेले पैसे मागण्यासाठी गायकवाड यांच्या घरी रविवारी (ता.२१) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास गेले होते. तेव्हा त्यांच्यासोबत भाऊ करण शिंदे व त्याचा मेहुणा करण चांदणे गेले होते. अर्जुन शिंदे यांनी दिप गायकवाड यांच्याकडे कामाचे पैसे मागितले. तेव्हा गायकवाड यांनी शिवीगाळ करून पैसे देत नाही, जे करायचे आहे ते कर असे शिंदे यांना म्हणाले. त्यावेळी शिंदे म्हणाले, ‘माझ्या कष्टाचे पैसे मला द्या’ .
दरम्यान, दीप गायकवाड व त्याचे मित्र रमेश प्रकाश मेकलवार व सुरजितसिंग सयान या सर्वांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना शिवीगाळ करून लाकडी दंडूक्यासह दगडाने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीमध्ये अर्जुन शिंदे, करण शिंदे, वंदना शिंदे व करण चांदणे हे चार जण जखमी झाले आहेत.
याप्रकरणी अर्जुन शिंदे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.