पुणे : भारती विद्यापीठ परिसरात सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या शाळकरी मुलाशी अश्लील कृत्य करणाऱ्या सुरक्षारक्षकाविरुद्ध पोलिसांनी रविवारी (दि. २०) गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात पीडित मुलाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकाविरुद्ध बालक लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलेचा नऊ वर्षांचा मुलगा सोसायटीच्या आवारात खेळत होता. त्यावेळी सुरक्षारक्षक नागराजने मुलाशी अश्लील कृत्य केले. मुलाने या प्रकराची माहिती आईला दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यंतरी लष्कर भागातील एका शाळकरी मुलावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एका शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोंढवा भागातील एका शाळकरी मुलावर सोसायटीच्या आवारात अल्पवयीनांनी अत्याचार केल्याची घटना पंधरा दिवसांपूर्वी घडली होती. अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेल्या दहा महिन्यांत अल्पवयीनांवरील अत्याचार प्रकरणात साडेतीनशेहून जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर, उपनगरातील पोलीस ठाण्यात अशा प्रकारचे दररोज किमान एक ते दोन गुन्हे दाखल होत आहेत. शाळेत योग्य आणि अयोग्य स्पशार्बाबत समुपदेशन करण्यात येते. समुपदेशनामुळे बहुतांश प्रकरणात अल्पवयीनांवरील अत्याचारांना वाचा फुटत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे.