लोणी काळभोर (पुणे): पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने भरधाव वेगात गाडी चालवत दुचाकीला धडक दिली होती. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी मदत मिळावी म्हणून ‘पुणे प्राईम न्यूज’ने ‘कुंजीरवाडी येथे आरटीओ अधिकाऱ्याने दुचाकीवरील दोघांना उडवलं, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून स्थानिक नेत्याची मध्यस्थी ; बिल न दिल्याने रुग्ण अडकले रुग्णालयात..’ या मथळ्याखाली बातमी गुरुवारी (ता.११) प्रसिद्ध केली होती. ‘पुणे प्राईम न्यूज’च्या या बातमीची दखल घेऊन अखेर आठ दिवसांनंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पुणे प्राईम न्यूज’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संभाजी गावडे (वय-५०, रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तर या अपघातात निखिल बाळासाहेब पवार (वय -26, राहिंज वस्ती, लोणी काळभोर) व विकास नामदेव राठोड (वय-32, वायकर वस्ती, कुंजीरवाडी) अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी विकास राठोड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास राठोड व त्यांचे मित्र निखिल पवार हे दुचाकीने पुणे-सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने निघाले होते. तर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संभाजी गावडे हे त्यांच्या कुटुंबासोबत सोलापूरच्या दिशेने निघाले होते. दरम्यान, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.
संभाजी गावडे यांनी चुकीच्या दिशेने भरधाव वेगात गाडी चालवत दुचाकीला कुंजीरवाडी गावातील चौकात बुधवारी (ता.३) सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास विकास राठोड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन तरुण गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संभाजी गावडे यांनी दोन्ही जखमींच्या नातेवाईकांना उपचाराचा खर्च देण्याचे आमिष दाखवत वरील अपघाताचा गुन्हा लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दाखल होऊ दिला नव्हता. तर दुसरीकडे “साहेब” खर्च देणार असल्याने, नातेवाईकांनीही अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास उत्सुकता दाखवली नव्हती. गावडे यांनी सुरुवातीला रुग्णांना दवाखान्यात दाखल करतेवेळी सुमारे 1 लाख 10 हजार रुपये बिल दिल्याची माहिती मिळत आहे.
या अपघातात जखमी झालेल्या निखिल पवार यांच्या खांद्याचे हाड तुटले होते. त्यांच्यावर हाडाची व पायाच्या अस्थीरज्जूची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी सुमारे 2 लाख 85 हजार रुपये एवढा खर्च आला आहे. तर विकास राठोड यांच्या पायाच्या मांडीचे हाड तुटले होते. त्यांच्या पायामध्ये रॉड टाकण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना 2 लाख 5 हजार रुपयांचे बिल आले आहे. मात्र, दोन्ही रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा खर्च देण्यास साहेबांनी ऐनवेळी हात वर केल्याने, निखिल पवार व विकास राठोड या दोघांना उपचार संपल्यावरही मागील तीन दिवसांपासून रुग्णालयातच खितपत पडावे लागले होते.
दरम्यान, या घटनेची ‘पुणे प्राईम न्यूज’ने दखल घेऊन गुरुवारी (ता.११) बातमी प्रसिद्ध केली होती. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी संभाजी गावडे खडबडून जागे झाले आणि त्यांनी रुग्णालयातील बिल त्वरित भरले. त्यानंतर दोन्ही रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले. याप्रकरणी विकास राठोड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संभाजी गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.