शिरूर (पुणे): ग्रामपंचायतची अधिकृत परवानगी न घेता गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याने १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निमोणे (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. ११) रात्री ११ ते शनिवारी (दि. १२) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब बबनराव शेळके (वय ५३, रा. आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी शामकांत राजहंस काळे, संजय ज्ञानदेव काळे, भाऊसाहेब भागचंद काळे, संतोष ज्ञानदेव काळे, गोरक्ष नाना काळे, संदिप किसन काळे, विजय खंडू पोटे, दिलीप चंदर काळे, अक्षय धोंडीबा दोरगे, संतोष माणिक जाधव, प्रविण बाबुराव दोरगे, संदिप अर्जुन गव्हाणे, सागर दिलीप काळे, श्रीकांत प्रकाश दोरगे, नागेश रघुनाथ काळे, शिवाजी राजाराम जाधव, प्रमोद वसंत जगताप (सर्व रा. निमोणे, ता. शिरुर, जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, पोलीसांनी महाराष्ट्र राज्य पुतळ्याचे पावित्र्य भंग अधिनियम १९९७ चे क-११ म.पो.का.क.१३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे ग्रामपंचायतच्या गावठाण हद्दीत ग्रामपंचायतची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. सदर प्रकाराबाबत गटविकास अधिकारी महेश डोके यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या तोंडी आदेशानुसार शेळके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवाजी बनकर हे करीत आहेत.