माळेगाव: केवळ धक्का लागला म्हणून खासगी क्लासेसमधील विद्यार्थ्यांच्या दोन गटांत लोखंडी कोयते, प्लास्टिक पाइप व दगडाने रस्त्यावर तुफान हाणामारी झाली असून, एका अल्पवयीन विद्यार्थ्यांसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना माळेगाव (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. ९) दुपारी एक वाजता घडली आहे.
एका १७ वर्षीय अल्पवयीन व त्याच्या गटाचे चंद्रकांत उत्तम कोकरे (वय २५), अथर्व रिधान कोकरे (वय १९), कल्याण धनसिंग कोकरे (वय १९), नीलेश छगन कोकरे (वय २५, सर्व रा. अहिल्यानगर, धुमाळवाडी, ता. बारामती), तर विवेक बाळासो घाडगे (वय १८) त्याच्या बाजूने अभिषेक सुरेश तावरे (वय २३), समीर जमीर शेख (वय २३), विशाल महेंद्र तावरे (वय २२, सर्व रा. माळेगाव बु. ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात श्रीकांत तुकाराम कराडे (रा. माळेगाव बु, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचा माळेगाव येथे खासगी क्लासेसचा व्यवसाय आहे. त्यांच्या क्लासेसमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून एक १७ वर्षांचा अल्पवयीन विद्यार्थी व विवेक बाळासो घाडगे यांच्यात वाद झाल्याने तक्रार देण्यासाठी माळेगाव पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, किरकोळ वाद असल्याने तक्रार न देता बैठक घेऊन मिटवला. त्यानंतर दोन्ही मुले व त्यांचे पालक हे सर्व जण क्लासेसमधून बाहेर पडल्यानंतर कोकरे व घाडगे या दोन गटांत शिवीगाळ व हाणामारी चालली होती. या भांडणात अभिषेक तावरे, समीर शेख यांच्या हातात लोखंडी कोयते तर विशाल तावरे, विवेक तावरे, अथर्व कोकरे, नीलेश कोकरे यांच्या हातात प्लास्टिकचे जाड पाईप, चंद्रकांत कोकरे यांच्या हातात दगड होते. दोन्ही गटांत तुफान राडा झाला. पुढील तपास हवालदार सादिक सय्यद करीत आहेत.