चाकण : चाकण एमआयडीसीतील निघोजे गावच्या हद्दीतील गट नंबर २६० मधील पार्किंगमध्ये बेकायदेशीर डिझेल टाकीमध्ये साठवून ठेवलेला व विनापरवाना मशीनद्वारे मिसळून ते कंटेनरमध्ये भरताना आणि कोणतीही सुरक्षा प्रणाली वापरली नसल्याचेही निदर्शनास आल्याने महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
खेडच्या तहसीलदार ज्योती रामदास देवरे (वय ४७, रा. राजगुरुनगर, ता. खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अमित बम व त्याचा मॅनेजर सत्यप्रकाश यादव, दिनेश नवानी, रमेश किसन इंगोले, मनेश मनोहर जागडे, प्रभूनाथ राजभर यांच्यासह जमीन मालक गणपत कचरू बेंडाले, सतीश कचरू बेंडाले, सिद्धार्थ सुनिल बेंडाले व इतर संबंधित जागा मालक (सर्व रा. निघोजे, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, चाकण एमआयडीसीतील निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीत २२ ते २४ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. निघोजे गावच्या हद्दीत डिझेल टाकीमध्ये साठवणूक विना परवाना मशीनद्वारे एकूण ३६ कंटेनरमध्ये व टँकरमधील डिझेल मोटारीच्या सहाय्याने प्लास्टिक टाकीमध्ये मिसळून ते कंटेनरमध्ये भरताना वरील सर्व आरोपी मिळून आले. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.