पुणे : पुणे जिल्ह्यातील सोरतापवाडी गावातील स्मशानभूमीत मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. आता या घटनेच्या सखोल तपासानंतर पोलिसांनी गणेश तात्यासाहेब चौधरी (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. सोरतापवाडी, मारुती मंदिराशेजारी, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ कलम ३ अंर्तगत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरभी अमोल मानमोडे (वय ३१ वर्षे, रा. जे २/ ५०८, मांजरी ग्रीन वुडस, हडपसर पुणे) फिर्याद दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, व्यावसायिक वादातून मित्राचा मृत्यू होण्यासाठी पुण्यातील सोरतापवाडीजवळ स्मशानभूमीत गणेश तात्यासाहेब चौधरी याने सात डिसेंबर रोजी रात्री अघोरी पूजा घातली. गणेश चौधरी हा अवैध सावकार आहे. पुण्याजवळील सोरतापवाडीमध्ये राहणारा त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने चक्क स्मशानभूमीत ही अघोरी पूजा घातली. एवढेच नव्हे तर त्याच्या कुटुंबाचा नाश व्हावा यासाठी त्याने चक्क मंत्राचे पठण देखील केले.
दरम्यान, या धक्कादायक घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर गणेश चौधरी याच्या विरोधात मानमोडे यांनी पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. सोरतापवाडीच्या स्मशानभूमीमध्ये चौधरी हा रात्री-अपरात्री जाऊन वेगवेगळ्या अघोरी पूजा घालत असल्याची माहिती यानिमित्ताने उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली.