भिगवण: सावकारी पाश हा गळ्याभोवती पडलेल्या फाशीच्या विळख्याहून भयंकर असतो, असं म्हटलं जातं. सावकाराच्या जाचाने लोकांचं, त्यांच्या कुटुंबीयाचं जीवन हे असह्य झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशीच एक घटना भिगवण येथे घडलीआहे. याप्रकरणी मदनवाडी (ता. इंदापूर) येथील कुप्रसिद्ध वेश्या व्यावसायिक व सावकार नामदेव बंडगर याच्यावर सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सध्या तो फरार आहे. याबाबत प्रा.तुषार क्षीरसागर यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण येथील जीवन क्षीरसागर यांनी नामदेव बंडगर याच्याकडून दीड वर्षांपूर्वी एक लाख पन्नास हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात व्याजासहित तीन लाख परत देऊनही तो आणखी एक लाख पन्नास हजार रुपयांची मागणी करत होता. क्षीरसागर यांनी पैसे न दिल्यामुळे नामदेव बंडगर याने त्यांना हॉटेल आनंद (मदनवाडी) येथील लॉजवर दिवसभर डांबून ठेवले. त्यानंतर त्याने व त्याच्या दोन साथीदारांनी जीवन क्षीरसागर यांना डोक्यावर, तोंडावर हाताने, लाथा व बुक्क्यांनी मारहाण केली असून त्यात ते जबर जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन (किंमत ५० हजार रु.) त्यांनी हिसकावून घेतली आहे. सध्या ते पुणे येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जीवन क्षीरसागर यांची काही महिन्यांपूर्वी हृदयाची बायपास सर्जरी झाली आहे. याबाबत त्यांनी नामदेवला सांगूनही त्यांच्या छातीवर बसून त्याने बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच पैसे न दिल्यास जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे या घटनेबाबत कोणाला काही सांगितल्यास माझ्या इसमामार्फत ॲट्रॉसिटीची केस दाखल करीन, असा दम दिला. या प्रकरणी भा.द.वि. कलम ३२५, ३२७, ३४२, ५०४, ५०६, ३४ तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार कलम ३९ व ४५ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.
कठोर कारवाईची गरज:
अवैध सावकारीमुळे भिगवण व परिसरात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या रक्तपिपासू सावकारीमुळे अनेकांना आपले घर, गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे. काही जण तर सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अवैध सावकारीला मुळापासून संपवण्याची गरज आहे.