भोर : भाटघर धरण प्रकल्पग्रस्त दाखला मिळवण्यासाठी एका व्यक्तीने भोरच्या महसूल कार्यालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. परंतु, या प्रतिज्ञापत्रात मयत व्यक्तीच्या सर्व वारसदारांची नावे नमूद केली नाही. ही बाब उघडकीस आल्यानंतर संबंधित मंडल अधिकाऱ्याने भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
ऋषीकेश संतोष दानवले (रा. बारे बुद्रुक, ता. भोर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की ऋषीकेश दानवले यांनी भोर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे १ नोव्हेंबर २०२२ ला प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जासोबत त्यांनी दिलेल्या दोन्ही प्रतिज्ञापत्रांमध्ये मयत महादू बाळू दानवले यांच्या वारसांच्या वंशावळीची माहिती देऊन प्रकल्पग्रस्त दाखला प्राप्त करून घेतला होता. परंतु, मयत महादू दानवले यांच्या वारसांची वंशावळ ही अपूर्ण व दिशाभूल करणारी असल्याचा तक्रारी अर्ज रामदास दानवरी यांनी भोरचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केला.
सदरचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर राजेंद्र कचरे यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ८ जानेवारी २०२३ ला स्थानिक चौकशी केली असता मयत महादू बाळा दानवले यांना इतरही वारसदार असल्याचे आढळून आले. ऋषीकेश दानवले यांनी प्रकल्पग्रस्त दाखला मिळविण्याकरीता प्रतिज्ञापत्रामध्ये वंशावळीची अपूर्ण माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्यामुळे मंडल अधिकारी सुनील धर्मकांबळे यांच्या फिर्यादीवरून ऋषीकेश दानवले यांच्यावर भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.