पुणे : विवाहाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध मंगळवारी (दि. १३) मार्केटयार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अक्षय अशोक बनसोडे (वय २९, रा. इंदिरानगर, बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात मुलीच्या आईने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बनसोडे आणि पीडित मुलीचे प्रेमसंबंध होते. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती बनसोडेला होती. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिला पळून जाऊन विवाह करू, असे सांगितले.
त्यामुळे सोमवारी (दि. १२) रात्री मुलगी कोणाला काही न सांगता घरातून बाहेर पडली. दुसऱ्या दिवशी मुलगी घरी आली. मुलीच्या आईने तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा सोमवारी रात्री आरोपी बनसोडेने तिला मार्केटयार्ड भागात बोलावून घेतल्याचे तिने सांगितले. त्याने बिबवेवाडीतील निर्जन जागी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिच्या आईने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात धाव घेत बनसोडे याच्या विरोधात फिर्याद दिली.