शिरूर : एका बड्या पत्रकार संघटनेच्या दोन कथित पत्रकारांकडून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका ठेकेदाराला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून तीस हजार रुपये उकळल्याचे प्रकरण ताजे असतानाच, आता त्याच संघटनेच्या शिरूर तालुक्यातील एका पदाधिकाऱ्यावर बेकायदा दारूची वाहतूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
धनंजय तुकाराम तोडकर (वय ४६, रा. केंदूर ता. शिरुर जि. पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे. धनंजय तोडकर हा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह न्यूज चॅनेलचा मुख्य संपादक असून शिरूर तालुका डिजिटल पत्रकार परिषदेचा तालुकाध्यक्ष आहे. एवढेच नव्हे तर तोडकर हा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार युवा मंचाचा तालुकाध्यक्ष असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मागील चार दिवसांच्या आत दोन तालुक्यातील मोठ्या पदाधिकाऱ्यांची बोगस प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यामुळे पत्रकारांवर विश्वास ठेवायचा की नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच या दोन प्रकरणांमुळे पत्रकारांच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष तयार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातून एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारु घेऊन चाकणच्या दिशेकडे जाणार आहे, अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पाबळ चौकात शनिवारी (ता.१३) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सापळा रचला.
दरम्यान, पोलिसांना पाबळ चौकात एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी संशयास्पद आढळून आली. पोलिसांनी गाडी थांबवत तपासणी केली असता, गाडीमध्ये बेकायदा देशी-विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी गाडीसह ५ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानदेव दत्तात्रय गोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार धनंजय तोडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हाडगळे करीत आहेत.
ही कामगिरी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, विकास पाटील, प्रतिक जगताप यांच्या पथकाने केली आहे.
आमदार अशोक पवार युवा मंच हे स्थापन केल्याची माहिती नाही..
याबाबत बोलताना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार म्हणाले, “कथित पत्रकार धनंजय तुकाराम तोडकर हा माझा कार्यकर्ता असून आमदार अशोक पवार युवा मंच हे स्थापन केलेलं मला माहितीहि नाही. बातमीच्या माध्यमातून मला आत्ता समजले आहे. माझा तोडकर याच्याशी कसलाही संबंध नाही.”
‘या’मुळे चांगल्या पत्रकारांची बदनामी
सध्या शहरासह ग्रामीण भागात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. हे कथित पत्रकार सुरुवातीला अवैध धंद्याबाबत स्वतः तक्रारी करतात आणि सेटलमेंटच्या नावाखाली लाखो रुपये उकळतात. यातील काही जणांचे तर स्वतःचे अवैध धंदे आहेत. व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या बोगस पत्रकारांवर कोणाचाही वाचक नसल्याने ते अगदी खुलेआम अवैध काम करत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या कथित पत्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
दुसऱ्या बाजूला जे पत्रकार आपली पत्रकारिता अगदी मन लावून इमानदारीने करत आहेत, त्यांच्याकडे या बोगस पत्रकारांमुळे वेगेळ्या नजरेने पहिले जाते. एक प्रकारे चांगल्या पत्रकारांची ही बदनामी आहे.