पुणे: जिल्ह्यातील भूअभिलेख विभागाचे दोन वरिष्ठ अधिकारी सध्या अडचणीत आले आहेत. जमिनीच्या मोजणीसंदर्भात ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या गंभीर आरोपांनंतर उप-अधिक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधिक्षक किरण येटोळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रारदाराने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे थेट तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासनाने लक्ष घातल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, तक्रारदाराने २०२३ पासून पुणे ग्रामीणमधील एका शेतजमिनीची मोजणी व हद्द निर्धारण प्रक्रियेबाबत सातत्याने अर्ज करूनही अधिकारी टाळाटाळ करत होते. याच दरम्यान, अमरसिंह पाटील व किरण येटोळे यांनी कामासाठी ५० लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर, “हेलिकॉप्टर शॉट लावतो” अशा प्रकारची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. या तक्रारीनंतर पुणे शहरातील आर्थिक व सायबर गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हवेली कार्यालयातील गलथान कारभार ‘पुणे प्राईम न्यूज’ने सर्वप्रथम आणला होता उजेडात
हवेली तालुक्यातील बहुली भगतवाडी येथील शेतकऱ्याची चुकीच्या मोजणीमुळे शेतजमीन चोरीला गेल्याच्या प्रकरणासह हवेली मोजणी कार्यालयातील गलथान कारभार ‘पुणे प्राईम न्यूज’ने सर्वप्रथम प्रशासनासह नागरिकांसमोर आणला होता. यास पंधरा दिवसाचा कालावधी पुर्ण होण्यापूर्वीच हवेलीचे उपअधिक्षक पाटील यांच्या कामकाजाची तपासणी सुरू झाली होती. सध्याच्या घडीला देखील अमरसिंह पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते आजपर्यंत केलेल्या सर्व कामांची तपासणी करण्यात येत आहे.