पिंपरी (पुणे): दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीची परस्पर विक्री करून मूळ जमीनमालकास धमकी दिली. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०२१ ते ७ ऑगस्ट २०२४ या कालावधीत चऱ्होली येथे घडली. जगन्नाथ दामोदर कांबळे (वय ६७, रा. साठेवस्ती, लोहगाव) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामदास पंडित काळजे, विकास काळजे, तुषार काळजे आणि अविनाश काळजे (सर्व रा. काळजेवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कांबळे यांची चहोली येथे प्लॉट नंबर २४ मध्ये जमीन आहे. या जमिनीशी आरोपींचा काहीएक संबंध नसताना त्यांनी प्लॉट नंबर ५९ ची विक्री केली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या जमिनीशी काहीही संबंध नसताना प्लॉट नंबर २४ दाखवून त्या जमिनीचा ताबा दिला. तसेच फिर्यादी कांबळे यांना त्यांच्याच जागेत येण्यास अडथळा करून सदर जागेत पाय ठेवल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तो प्लॉट आम्हालाच विक्री करायचा. आम्ही सांगू तो प्लॉट घ्यायचा, अशी खंडणी मागून समक्ष व फोनद्वारे वारंवार धमकी दिली. तसेच प्लॉटचे कंपाऊंड पाडून नुकसान केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.