लोणीकंद: “हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली” असे म्हणत दोघांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना वाघोली (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रियांका नगरीतील द टेरेस हॉटेलमध्ये शनिवारी (ता.११) रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात हॉटेल मालकासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अफरोज अकबर तांबोळी (वय ३०, पत्ता घुलेनगर विक्रम वाईन्सचेसमोर मांजरी बुद्रुक हडपसर जि. पुणे) यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वैशाली सोमनाथ ताकवणे (वय ३०, रा. भेकराई नगर हडपसर पुणे), रोहीत महादेव निंबाळकर (वय २७ रा. रेणुका कॉम्लेक्स उबाळेनगर वाघोली पुणे), मंगेश आणि स्वप्नील (दोघांचेही पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अफरोज तांबोळी, त्यांचा मावस भाऊ साजीद इब्राहीम तांबोळी व त्यांचे दोन मित्र वाघोली येथील द टेरेस हॉटेल (जाधव वेअर हाऊस, प्रियांका नगरी वाघोली, पुणे) येथे जेवण करण्यासाठी गेले होते. “हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली” असे म्हणून आरोपींनी काउंटरवर ठेवलेली बीयरची बाटली फिर्यादी व त्यांच्या मावस भावाच्या डोक्यात फोडली. तसेच फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सारंग दळे करीत आहेत.