पुणे : दहा तोळे वजनाचे तीन राणीहार चांगल्या प्रकारे तयार करून देतो, असे सांगून महिलेकडून ३० तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये असा एकूण १७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी तक्रारदार महिलेसह इतर पाच महिलांची अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. या प्रकरणी शीतल राजेंद्र गायकवाड (रा. डी मार्टजवळ, आंबेगाव बु., पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार बाबूराव तुकाराम कांबळे, निर्मला बाबूराव कांबळे (रा. आंबेगाव बु.), अनिल बाबूराव कसबे, सुनील बाबूराव कसबे (वय ३३, दोघे रा. सनविंव सोसायटी, आंबेगाव १ बु.) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २ फेब्रुवारी २०२३ ते २६ जून २०२४ या कालावधीत आंबेगाव बु. येथील माऊली ज्वेलर्स या दुकानात घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव येथे माऊली ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. आरोपींनी तक्रारदारांना प्रत्येकी १० तोळे वजनाचे तीन असे एकूण ३० तोळे वजनाचे सोन्याचे राणीहार चांगल्याप्रकारे बनवून देतो असे सांगितले. आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून १२ लाख ५० हजार रुपये किमतीचे २५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. तसेच ५ लाख रुपये रोख असा एकूण १७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज घेतला. पैसे आणि दागिने घेतल्यानंतर आरोपींनी अद्यापपर्यंत राणीहार अथवा घेतलेले दागिने व पैसे परत न करता अपहार करून फसवणूक केली. आरोपींनी परिसरातील पाच महिलांचीदेखील अशाच प्रकारे फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.