लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे माहिती असतानादेखील १६ वर्षाच्या मुलीचा विवाह केल्याची धक्कादायक घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात घडली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आईसह ५ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय पिडीत मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा २०२३ ते २०२४ या एक वर्षाच्या कालावधीत कुंजीरवाडी येथे घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीचा विवाह तिच्या आईने कुंजीरवाडी येथील एका तरुणाशी ठरविला होता. विवाहाच्या वेळी मुलगी १६ वर्षाची असतानादेखील देखील या विवाहाला कोणीच विरोध केला नाही. हा विवाह नायगाव फाटा परिसरातील एका मंगल कार्यालयात पार पडला.
दरम्यान, विवाहानंतर आरोपी पतीने पिडीता अल्पवयीन असल्याचे माहिती असतानादेखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शाररीक संबंध ठेवले. यातून पिडीता गरोदर राहिली. प्रसुतीदरम्यान, अल्पवयीन मुलीच्या ८ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पिडीत मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ५ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पतीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.