पुणे : पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात काम करत असल्याचे भासवून मंडळाच्या बँक खात्यातून तब्बल 45 लाख 54 हजार 917 रुपये ट्रान्स्फर करुन घेत फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या सोमवार पेठेतील कार्यालयात 8 सप्टेंबर 2022 ते 25 एप्रिल 2024 या दरम्यान घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
जिल्हा सुरक्षा मंडळाचे सचिव श्रीकांत हरि चोभे (वय-44 रा. पुणे-नाशिक हायवे, भोसरी, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अजय शिवाजी ठोंबरे (वय-30 रा. स्नेह नगर, परळी वैजनाथ, जि. बीड), केशव दत्तु राठोड (वय-22 रा. पुणे), विकास चंदर आडे (वय-33), पवन प्रमदास पवार (वय-26), मोकाश रतन राठोड (वय- 26 तिघे रा. वडगाव शेरी, पुणे), मिथुन शिवाजी राठोड (वय-31 रा. दहिफळ ता. मंठा, जि. जालना), योगेश संभाजी मोडाले, लखन देवीदास परळीकर यांच्यावर भादंवि कलम 409, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत चोभे हे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सचिव पदावर कार्यरत आहेत. सोमवार पेठेत मंडळाचे ऑफिस आहे. आरोपी अजय ठोंबरे हा ब्रिक्स फॅसिलीटी प्रा. लि. कंपनीमार्फत पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कारकून म्हणून कामाला होता. ठोंबरे मंडळात काम करत असताना व वरील आरोपी हे सुरक्षा रक्षक मंडळात कोणतेही काम नसताना त्यांनी सुरक्षा रक्षक मंडळात काम करत असल्याचे भासवले. बँक ऑफ इंडियाच्या पुणे शाखेत मंडळाचे खाते आहे. त्या बँक खात्यावरुन आरोपींनी 45 लाख 54 हजार 917 रुपये ट्रान्सफर करुन घेत सुरक्षा मंडळाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.