लोणी काळभोर: खेळता खेळता तोल जाऊन पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी परिसरात शनिवारी (ता.६ एप्रिल) घडली होती. बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपयोजना न केल्याने ठेकेदारावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रिन्स चंदनकुमार कोशले (वय-२, लोणी काळभोर, ता.हवेली) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर बापू शिवराम माने (वय ४४, रा. साठेवस्ती लोणीकाळभोर, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार विजय जाधव यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय जाधव हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. जाधव हे कर्त्यव्य बजावीत असताना, विश्वराज हॉस्पिटलच्या डॉ. पल्लवी साळुंखे यांनी खबर दिली की, प्रिन्स कोशले हा पाण्याच्या टाकीत पडला होता. त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आणले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा प्रिन्सचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर प्रिन्सच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालात प्रिन्सच्या मृत्यूचे कारण पाण्यात बुडून श्वासोच्छवास बंद (Asphyxia Due to drowning) पडल्याचे समोर आले.
दरम्यान, चंदनकुमार कोशले हे परप्रांतीय कुटुंब असून ते कामाच्या शोधात लोणी काळभोरमध्ये आले होते. त्यानंतर त्यांना बांधकाम मजूर म्हणून काम मिळाल्याने ते लोणी काळभोर परिसरात राहू लागले. दोघे पती-पत्नी बांधकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.
रायवाडी येथील गणेश खेडेकर यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरु होते. हे बांधकाम बापू माने यांना देण्यात आले होते. बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदार माने यांनी पाण्याच्या टाकीला झाकण बांधले नव्हते. त्यामुळे ही पाण्याची टाकी उघडीच होती. दरम्यान, प्रिन्स हा नेहमीप्रमाणे शनिवारी (ता.६) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास खेळत होता. प्रिन्सचा खेळता खेळता तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत जाऊन पडला.
बांधकामाच्या ठिकाणी ठेकेदार बापू माने याने काम करताना दुर्लक्ष करून हयगयीने व निष्काळजीपणे अंडर ग्राऊण्ड झाकण नसलेल्या पाण्याचे टाकीचे बांधकाम केले. त्यामुळे झाकण नसलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पडल्याने मुलगा प्रिन्स कोशले याचा पाण्यात बुडुन झाला आहे, अशी फिर्याद विजय जाधव यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार बापू माने याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत तरटे करीत आहेत.