पिंपरी: प्रशिक्षकाने त्याच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडूंना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे शासनाला सादर केली. याप्रकरणी प्रशिक्षकावर बुधवारी (दि.७) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी गणेश पोपट पाटील(वय ४५, रा. एरंडवणे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशुतोष मुरलीधर जगताप (पूर्ण पत्ता माहिती नाही. रा. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जगताप याने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविण्यासाठी त्याच्याकडे सरावासाठी असलेल्या खेळाडू यांचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक होते. त्याकरिता आरोपी जगताप याने फिर्यादी यांच्या मुलाच्या नावाचा १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर घेऊन त्यावर बनावट प्रमाणपत्र तयार केले. ती कागदपत्रे शासनाला सादर करून फिर्यादी आणि शासनाची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.