पुणे: नो-पार्किंगमध्ये लावलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीचा जॅमर काढण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक फौजदारासह ट्रॉफिक वॉर्डनविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार किरण दत्तात्रय रोटे (वय ५१, समर्थ वाहतूक विभाग) आणि ट्रॉफिक वॉर्डन अनिस कासम आगा (वय ४८, रा. कोंढवा) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे नावे आहेत. याप्रकरणी ३० वर्षांच्या तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांच्या नो-पार्किंगमध्ये लावलेल्या स्विफ्ट डिझायर कारला जॅमर लावला होता. तो जॅमर काढण्यासाठी ट्राफिक वॉर्डन यांनी तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी ११ ऑक्टोबर रोजी करण्यात आली. त्यात अनिस आगा याने तक्रारदार यांच्याकडे १ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ७०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तसेच अनिस आगा कार्यालयात उपस्थित नसताना सहायक फौदार किरण रोटे याने अनिस आगा याने मागिलेले पैसे माझ्याकडे दे, असे म्हणून लाच घेण्यास संमती दर्शवून प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे किरण रोटे, अनिस आगा यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.