पुणे : सोसायटीचा हिशोब मागितल्याने पदाधिकाऱ्यांनी आयटी कंपनीच्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाला वाळीत टाकून सामाजिक बहिष्कार टाकण्याचा प्रकार रविवारी (दि. ८) उघडकीस आला. यासंदर्भात पोलिसांनी महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत लोकांचे सरंक्षण कायद्यान्वये १३ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुपेश जुनावणे (वय ४७), दत्तात्रय साळुंखे (वय ५०), अश्विनी पंडित (वय ६०), अश्विन लोकरे (वय ५०), सुनिल पवार (वय ५२), जगन्नाथ बुर्ली (वय ५०), अनिरुद्ध काळे (वय ५०), सुमीर मेहता (वय ४७), संजय गोरे (वय ४५), शिल्पा रुपेश जुनावणे (वय ४५), अशोक खरात (वय ५०), वैजनाथ संत (सर्व रा. सुप्रिया टॉवर्स, नागरस रोड, औंध) ही गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सुप्रिया टॉवर्समध्ये २००३ मध्ये फ्लॅट घेतला होता. तो त्यांनी भाड्याने दिला होता. त्यानंतर ते फ्लॅटवर स्वतः राहण्यास आले. त्यांनी आरोपींकडे सोसायटीचा हिशोब मागितला. तेव्हा रुपेश जुनावणे यांनी तो दिला नाही. त्यानंतर सोसायटीमध्ये राहणाऱ्यांनी हेतुपुरस्पर त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना मानसिक त्रास देण्यात आला. त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा मुद्दाम वाजवून या कुटुंबाला घाबरवले जाते. तसेच, त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याच कार्यक्रमात भाग घेऊन दिला जात नाही. त्यांची हेतूपुरस्सर बदनामी केली जाते. यासंदर्भात या कुटुंबाने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.