पुणे: लोहगाव परिसरातील जमीन हडप केल्याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दिले आहेत. त्यानुसार विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजी करू खांदवे, सागर शिवाजी खांदवे, भरत शिवाजी खांदवे, सुनीता शिवाजी खांदवे, सन्यानेश्वर रामचंद्र खांदवे, पांडुरंग रामचंद्र खांदवे, सानी पांडुरंग खांदवे, रामचंद्र दौलत खांदवे, लक्ष्मी रामचंद्र खांदवे, शीतल ज्ञानेश्वर खांदवे आणि जनाबाई पांडुरंग खांदवे (सर्व रा. लोहगाव) यांच्याविरुद्ध जमीन हडप करण्याचा आणि प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात दत्तात्रय बबन खांदवे (रा. लोहगाव) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. जमिनीच्या वादातून संशयित आरोपी २०१३ पासून दत्तात्रय खांदवे व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत होते. पैशाच्या बळावर तसेच राजकीय दडपण आणून खांदवे कुटुंबीयांचे जगणे असह्य केले होते. त्यांनी ७ डिसेंबर २०२१ ला दत्तात्रय खांदवे व त्यांच्या कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला.
या मारहाणीचा व्हिडिओ आरोपी शिवाजी खांदवे याने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्याबाबत दत्तात्रय खांदवे यांनी अॅड. सुशीलकुमार पिसे यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.