बारामती, (पुणे) : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष व धोकादायक पद्धतीने डीजेचा आवाज कमी जास्त केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी 11 डीजे टेम्पो चालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. बुधवारी (ता. 28) सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याची माहिती बारामती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी जावेद अमिर शेख (रा. 159, दत्तवाडी), सुरज मधुकर साळवी (रा. लोणंद जि. सातारा), निखील प्रकाश (रा. कराड ता. कराड जि. सातारा), अभिषेक कानिफनाथ नागे (रा. इंदापुर रोड, बारामती ता. बारामती), संतोष आप्पा मोरे (रा. बारामती), संदिप जयवंत शिंदे, हुतेफा बागवान ( रा. वणवेमळा बारामती), सार्थक संतोष सातव (रा. सातववस्ती, माळेगाव रोड, बारामती), विजय शंकर माने (रा. पाहुणेवाडी ता. बारामती), वैभव शिंदे (रा. वाकड), गणेश राहुल सरोदे (रा. बारामती ता. बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अकरा जणांची नावे आहेत. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई राहुल कल्याण वाघ यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. 28) गुन्हे दाखल करण्यात आलेले टेम्पो चालक टेम्पोमध्ये धोकादायकरीत्या साऊंड लावत, तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या हॉस्पिटलकडे दुर्लक्ष करत मोठ्याने आवाज वाढवून सार्वजनिक शांतता भंग केली. वेळोवेळी डिजे साउंड सिस्टीम थांबविण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.