लोणी काळभोर: दारू पिताना झालेल्या वादातून एकाने गवंड्याच्या पोटात चाकू खुपसल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या सरकार मान्य देशी दारुच्या दुकानासमोर बुधवारी (ता.16) रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात गवंडी जखमी झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमंत केरू राठोड (वय 40, रा. गुजरवस्ती, कवडीपाठ टोलनाक्याजवळ,कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर दिपक कामटे (रा. पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंत राठोड हे एक गवंडी आहेत. राठोड हे बांधकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. राठोड यांना दारू पिण्याचे व्यसनसुद्धा आहे. राठोड यांनी शेवाळवाडी येथे काम केले होते. त्या कामाचे पैसे आणण्यासाठी ते गेले होते. पैसे घेवून परत येत असताना ते कवडीपाठ टोलनाक्याजवळील बालाजी हाईट येथील देशी दारुच्या दुकानाजवळ दारू पिण्यासाठी थांबले.
दरम्यान, राठोड हे दारु पित असताना दिपक कामठे याने एक कॉटर घेवून देण्यास त्यांना सांगितले. तेव्हा राठोड यांनी कामठे याला दारु घेवून देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरून कामठे याने कपडयात लपवलेला चाकू काढून राठोड यांच्या पोटात खुपसला. त्यानंतर कामठे हा घटनास्थळावरून पसार झाला.
या हल्ल्यात राठोड हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राठोड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी दिपक कामठे याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (1), 351 (2) (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भापकर करीत आहेत.