पुणे : हाउसिंग लोन घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून, बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साऊथ इंडीयन बँकेच्या विश्रांतवाडी शाखेत फेब्रुवारी २०१९ ते मार्च २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बँक मॅनेजर आतीश क्रिश्ण पिल्लाई (वय-४५, रा. केरळ) यांनी सोमवारी (ता. ८) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, एस. के. डेव्हलपर्सचे प्रतिक पद्माकर खराडे (रा. किवळे, पुणे), दवेंद्र राजू गायकवाड (रा. खडकी बाजार), राजू रामचंद्र गायकवाड, नरेश जगन्नाथ भंडारी (रा. घोरपडी गाव, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे साऊथ इंडीयन बँकेच्या विश्रांतवाडी शाखेत मॅनेजर आहेत. तर दवेंद्र गायकवाड, राजू गायकवाड आणि नरेश भंडारी हे सेलिंग एजंट आहेत. आरोपींनी संगनमत करुन त्यांच्या हाउसिंग लोन प्रपोजल फाईलसाठी लागणारे दस्त अॅग्रीमेंट टू सेल याच्यावर खोट्या सह्या व खोटे शिक्के मारुन बँकेला सादर केले. आरोपींनी खोटी कागदपत्रे बँकेला देऊन, ती खरी असल्याचे भासवून बँकेकडून १३ लाख २२ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करुन घेतले.
दरम्यान, मंजूर झालेल्या कर्जाच्या रकमेपैकी १२ लाख ९० हजार रुपयांचा डीडी एस.के. डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर प्रतिक खराडे यांच्या नावाने काढला. प्रतिक खराडे याने त्याच्या बँक खात्यात डीडी वटवून बँकेची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.