राहुलकुमार अवचट
यवत : यवत (ता. दौंड) ग्रामपंचायतीमध्ये ‘आर्थिक अपहार’ केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तथा सध्याचे इंदापूरचे गट विकास अधिकारी दत्तात्रय बापूराव केकाण यांना सक्तीने सेवानिवृत्त तसेच अपहारातील ११ लाख रुपये सेवानिवृत्ती वेतनातून वसुल करण्याचे ‘आदेश’दिले आहेत. हे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आपल्या निकालात दिले आहेत.
दत्तात्रय बापुराव केकाण (तत्का. ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत यवत, ता. दौंड) यांच्या विरुद्ध खालील आरोप ठेऊन खाते निहाय चौकशी करणेसाठी सहा. आयुक्त (चौकशी), विभागीय खातेनिहाय चौकशी. परिषद सेवक, विधानभवन, पुणे यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. सहा. आयुक्त (चौकशी) यांनी सदर प्रकरणी खाते निहाय चौकशी करुन संदर्भ क्र. 4 अन्वये चौकशी अहवाल सादर केला आहे.
सहा. आयुक्त (चौकशी) यांनी चौकशी केली असता, दत्तात्रय केकाण यांनी विकास कामे करताना विहीत पध्दतीचा अवलंब न करणे, पाणी पुरवठा योजनेवर केलेल्या खर्चाबाबत, संपूर्ण स्वच्छता अभियान खर्चाबाबत, ग्रामनिधीतून केलेल्या खर्चाबाबत, पर्यावरण संतुलित ग्रामयोजना खर्चाबाबत, इमारत बांधकामाचे पूर्णत्वाचे दाखले नसताना घराच्या नोंदी केले बाबत, निविदा कार्यप्रणालीचा अवलंब न करता विकास कामे केल्याबाबत, ग्रामपंचायतीचे लेखे अपूर्ण असलेबाबत, गाळा भाडे ठरविताना उपअभियंता बांधकाम विभाग यांचेकडून चालू दराप्रमाणे भाडेवाड ठरवून घेतले बाबतची कागदपत्रे खुलाशासोबत सादर केली नाही, बेअरर चेकव्दारे रक्कमा प्रदान केलेबाबत खुलासा सादर न करणे या आरोपांमध्ये तथ्य आढळून आले आहे. या आरोपांमध्ये केकाण यांना दोषी धरण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिलेल्या निकालात असे म्हटले आहे कि,दत्तात्रय केकाण यांना सक्तीने सेवानिवृत्त करणे व वसुलपात्र रक्कम सेवानिवृत्ती वेतनातून वसूल करणे ही शिक्षा करणत येत आहे. केकाण यांच्याकडून कायमस्वरूपी अपहारीत रक्कम रु.10,85,876/- ही त्यांना मिळणाऱ्या सेवानिवृत्ती विषयक लाभ रक्कमेतून किंवा निवृत्तीवेतनातून समान हप्त्यात वसूल करण्यात यावी. तसेच वसूल करण्यात आलेल्या रक्कमेचे लेखे वेळोवेळी अद्यायावत करण्यात यावे व वसूलपात्र रक्कमसंबंधित ग्रामपंचायतीच्या ज्या योजनेतून अपहार झाला आहे त्या योजनेच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, दत्तात्रय केकाण यांनी दिनांक 03/07/2015 ते दि. 23-04-2021 अखेर 2122 दिवसांचा निलंबन कालावधी हा महाराष्ट्र नागरी सेवा (निलंबन, बडतर्फी इ. कालावधी तील प्रदाने) नियम 1981 मधील नियम 72 मधील तरतूदीनुसार निलंबन काळ म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे उक्त शास्ती आदेशाची नोंदी ग्राम विकास अधिकारी केकाण यांच्या मूळ सेवा नोंद पुस्तकामध्ये घेण्यांत यावी असे आदेशात म्हटले आहे.
याबाबत बोलताना मूळ तक्रारदार उत्तम गायकवाड व शब्बीरभाई सय्यद यांम्हणाले कि, आम्ही जे भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते खातेनिहाय चौकशी झाली आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे आता पुढे आले आहे. आणि या संदर्भामध्ये आम्ही विभागीय आयुक्तांकडे याबाबत दाद मागणार असून जी रक्कम आकारण्यात आली आहे. ती सरकारी व्याजानुसार आकारण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे म्हटले आहे.