-बापू मुळीक
सासवड : पिंपरे खुर्द येथील अपघातग्रस्त तीन युवकांच्या कुटुंबांना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून दिल्याशिवाय गावात पाऊल ठेवणार नाही हा शब्द माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अखेर खरा करून दाखवला. पिंपरे खुर्द गावामधील ओंकार थोपटे, अनिल थोपटे आणि पोपट थोपटे या तीन युवकांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. तीनही सामान्य कुटुंबातील युवक गेल्याने या कुटुंबांना मोठा धक्का बसला. मृतांच्या अंत्यविधीच्या दिवशी शिवतारे यांनी केलेली भीष्मप्रतिज्ञा पाळत गावात पाऊल ठेवला नाही. हे अर्थसहाय्य मंजूर झाल्यानंतरच आज गावात येऊन त्यांनी तीनही कुटुंबांना भेटी देत हे धनादेश मृत युवकांच्या पालकांना सुपूर्द केले.
यावेळी माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माणिक निंबाळकर, मंडल अधिकारी पी. आर भिसे, सरपंच राजेंद्र थोपटे, उपसरपंच नंदा थोपटे, रवींद्र गायकवाड, भरत थोपटे, स्वप्नील थोपटे, आकाश थोपटे, विश्वजित सोनावणे, प्रमोद सोनावणे, राहुल थोपटे, दिपक थोपटे, प्रशांत थोपटे, प्रकाश थोपटे, सचिन थोपटे, अमोल थोपटे, बाळासाहेब थोपटे, भालचंद्र थोपटे, संतोष थोपटे, सागर चांदे, नाना थोपटे, प्रतिक थोपटे व अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. मृत युवकांच्या कुटुंबातील नामदेव थोपटे, सुषमा थोपटे, संजय थोपटे या नातेवाईकांनी यावेळी धनादेश स्विकारला. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 3 लाख आणि गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून 2 लाख असे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य शिवतारे यांनी या कुटुंबांना मिळवून दिले.
यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, या तीनही कुटुंबांनी आपली कर्ती मुलं गमावली. त्यामुळे या कुटुंबांबरोबरच गावावर शोककळा पसरली होती. त्यामुळे या कुटुंबांना सावरण्यासाठी हातभार लावणे आवश्यक होते. या गरीब आई वडिलांची मुलं मी परत आणू शकत नाही पण मानवतेच्या भावनेतून मला जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मी अत्यंत आभारी आहे असेही शिवतारे म्हणाले.
शिवतारेंनी नाकारला सत्कार
यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी शिवतारे यांचे आभार मानले. ग्रामस्थांच्या वतीने शिवतारे यांच्या सत्काराचे आयोजन ठेवण्यात आले होते. पण शिवतारे यांनी ‘मी माझे कर्तव्य केले असून अशा दु:खद प्रसंगी सत्कार नको’ असे म्हणत सत्कार नाकारला.